संगमनेर:
सहकार क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यात उघडकीस आली असून, कर्ज देण्याच्या बहाण्याने एका अनुसूचित जातीच्या कुटुंबाची जमीन हडप केल्याप्रकरणी झोळे येथील ‘कै. विमल गुंजाळ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या’ संस्थापक अध्यक्षासह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावरगाव घुले येथील अशोक भागा खरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही फसवणूक २००५ पासून ते २०२६ या प्रदीर्घ काळात झाल्याचे तक्रारीतून समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि पतसंस्थेचा संस्थापक मधुकर बादशहा वाळे याने खरात कुटुंबाला कर्जाची गरज असताना गाठले आणि केवळ गहाणखत करण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला.


मात्र, प्रत्यक्षात खरात यांची सावरगाव घुले येथील मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी बनावट खरेदीखत तयार केले. या फसवणुकीची व्याप्ती मोठी असून, सहायक निबंधक कार्यालयातील काही घटकांच्या मदतीने बेकायदेशीर निकाल मिळवून वसुली अधिकाऱ्यांमार्फत मालमत्ता लिलावाच्या नोटिसा पाठवून खरात कुटुंब व त्यांच्या साक्षीदारांचा मानसिक छळ करण्यात आला. जमिनीवर जप्तीची नोटीस आल्यानंतर पीडित कुटुंबाने दुय्यम निबंधक कार्यालयात पडताळणी केली असता, त्यांची जमीन कागदोपत्री दुसऱ्यांच्या नावे झाल्याचे समोर आले.
या गंभीर प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संगमनेर तालुका पोलिसांनी मधुकर बादशहा वाळे, सरव्यवस्थापक सविता साहेबराव हासे, अध्यक्ष पोपट सोपान एरंडे, उपाध्यक्ष सीताराम निवृत्ती फटांगरे, संचालक शांताराम रेवजी जाधव, संचालिका कुसुम मधुकर वाळे, राधाबाई दत्तू रहाणे, मीराबाई साहेबराव हासे, संचालक मारुती रामकृष्ण वाळे, मच्छिंद्र भिकाजी घुले, गोविंद लक्ष्मण घुले, लिपिक रावसाहेब कारभारी टेकूडे, व्यवस्थापक संजय शिवाजी घुले आणि व्यवस्थापक किरण लहानू घुले अशा एकूण १४ जणांविरोधात भारतीय दंड विधान आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करत असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
