संगमनेर:
तालुक्यातील तिगाव येथे एका धाडसी घरफोडीची घटना समोर आली असून चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सव्वाबारा ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सुरेश विठ्ठल सानप यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


घटनेच्या दिवशी सानप कुटुंबीय घराशेजारील शेतात ज्वारी कापणीच्या कामात व्यस्त होते. घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील साडेतीन ग्रॅमची सोन्याची नथ आणि सुमारे १९ ग्रॅम वजनाचा सोन्याचा ‘साई’ हार असा एकूण ४० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
या घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. या चोरीप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर. ई. लांघे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
