Sat. May 30th, 2026

संगमनेर:
घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणाऱ्या विद्युत पंप चोरट्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. शेतातील विद्युत पंप आणि कॉपर केबलची चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींच्या टोळीला अटक करण्यात घारगाव पोलिसांना मोठे यश आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
भोजदरी येथील शेतकरी महेश गणपत हांडे यांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १३ फेब्रुवारीच्या रात्री त्यांच्या शेतातील आणि शेततळ्यातील विद्युत पंप तसेच कॉपरची केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती.

या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी बाळंद्री येथील किशोर सुरेश काळे, सागर सुरेश काळे आणि अनिल देमाभाऊ काळे या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच या तिघांनीही घारगाव परिसरात अनेक चोऱ्या केल्याची कबुली दिली.
आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गुन्हे समोर आले आहेत. या टोळीने घारगाव पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गुन्ह्यांची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून ७५० फूट कॉपर केबल, विविध अश्वशक्तीचे (HP) विद्युत पंप, एलईडी टीव्ही आणि ट्रॅक्टरची बॅटरी असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.

या तपासात अनेक शेतकऱ्यांचे चोरीला गेलेले साहित्य परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीचे हे साहित्य ज्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले, त्यामध्ये चैतन्यपूर, बाळंद्री, अकलापूर, येठेवाडी आणि आळे-रामवाडी येथील व्यक्तींचा समावेश आहे.
ही यशस्वी कामगिरी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात आणि त्यांच्या पथकाने केली आहे. घारगाव पोलीस आता या प्रकरणात अधिक सखोल तपास करत असून या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

By संपादक :- पंकज पडवळ

कार्यकारी संपादक:- निखिल चौधरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!