संगमनेर:
संगमनेरच्या तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराचा प्रकार पुन्हा एकदा उघड झाला असून, १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक कैलास विठ्ठल खाडे (रा. अकोले) याला अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी रंगेहात पकडले. अवघ्या आठवडाभरात महसूल विभागात झालेली ही दुसरी मोठी कारवाई असल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराला त्यांच्या मालमत्तेच्या वाटप पत्राचा आदेश करून हवा होता. या कामासाठी सर्व कायदेशीर कागदपत्रे पूर्ण असतानाही लिपिक खाडे याने १३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने वारंवार विनंती करूनही खाडे आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने, अखेर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली.


या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत एसीबीने गुरुवारी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. तहसील कार्यालयामध्ये कलम १५५ अन्वये अर्धन्यायिक सुनावणीचे काम आटोपून बाहेर आलेल्या खाडे याने तहसील परिसरातील एका चहाच्या टपरीवर तक्रारदाराला पैसे घेऊन बोलावले. तिथे लाचेची रक्कम स्वीकारून पैसे मोजत असतानाच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला झडप घालून बेड्या ठोकल्या.
विशेष म्हणजे, आरोपी खाडे यापूर्वी अकोले तहसीलमध्ये कार्यरत असतानाही त्याच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी होत्या, अशी माहिती आता समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर महसूल विभागात भ्रष्टाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, काही दिवसांपूर्वीच एका तलाठ्यावरही अशाच प्रकारची कारवाई झाली होती.
वारंवार होणाऱ्या या कारवायांमुळे विभागाची प्रतिमा मलीन होत असून, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कडक दखल घेऊन ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. याप्रकरणी सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
