संगमनेर:
शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत सुकेवाडी-समनापूर रोड परिसरातून तब्बल १० लाख ९४ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईत २१ किलो ४९० ग्रॅम गांजा आणि तस्करीसाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार पोलिसांनी ताब्यात घेतली असून दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत.


पोलीस कॉन्स्टेबल विजय अण्णा खुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १ मार्च २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अटकेत असलेल्यांमध्ये प्रथमेश उर्फ भैय्या पोपट राऊत (रा. घुलेवाडी) आणि प्रथमेश सुरेश गोलवड (रा. शिर्डी) यांचा समावेश आहे. यातील मुख्य आरोपी प्रथमेश राऊत हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून नाशिक आणि संगमनेर पोलिसांना गेल्या अनेक दिवसांपासून तो गुंगारा देत होता.
जप्त केलेल्या मालामध्ये ६ लाख ४४ हजार ७०० रुपये किमतीचा गांजा आणि ४ लाख ५० हजार रुपयांची कार असा एकूण ११ लाखांचा ऐवज आहे. मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या या अमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपी तेथे वावरत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत पुढील तपास करत आहेत.
