संगमनेर:
पिंपरी-चिंचवड येथील एका व्यापाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण करून पसार होणाऱ्या उत्तर प्रदेशातील पाच अट्टल गुन्हेगारांना संगमनेर पोलिसांनी हिवरगाव पावसा टोलनाका येथे शिताफीने अटक केली. या धाडसी कारवाईत अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली असून, आरोपींकडून दोन गावठी कट्टे, सहा जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ११ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी काळ्या रंगाच्या कारमधून आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने येत असल्याची माहिती श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली होती. या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने टोलनाक्यावर सापळा रचला, तर पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांनी खांडगाव फाटा येथे नाकाबंदी केली.
सोमवारी रात्री अकराच्या सुमारास संशयित कार टोलनाक्यावर येताच पोलिसांनी तिला चहुबाजूंनी वेढले आणि पाचही आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रशेखर दीपकचंद्र गौड (वय ३४), दिलीप मोहनलाल सरोज (वय २८), रिंकू अलगुराम सरोज (वय १७), अनिल गिरीधारीलाल सरोज (वय २६) आणि मुकेशकुमार राममुदर चव्हाण (वय २४) अशी आरोपींची नावे आहेत.
