संगमनेर:
संगमनेर शहरात कोयत्याचा धाक दाखवून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. साहिल विजय देवरे आणि अनिल काथे (दोघे रा. नवघर गल्ली, संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हे दोन्ही आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय होते आणि पोलिसांना सातत्याने गुंगारा देत होते. संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाला हे आरोपी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बुरंगवाडी येथे लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.


जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने सांगली गाठून या दोघांनाही बेड्या ठोकल्या. सध्या भिलवडी पोलीस ठाण्यात अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, पोलीस पथक आरोपींना घेऊन संगमनेरच्या दिशेने रवाना झाले आहे.
